औरंगाबाद : डॉक्टर दाम्पत्याने चहावाल्याला घातला दोन लाखांचा गंडा, प्रकरण उघड झाल्यानंतर कळले ७२ लाख लुटले

Foto

औरंगाबाद- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करुन दरमहिना कमाईचे अमिष दाखवून डॉक्टर दाम्पत्याने एका चहावाल्याला दोन लाखांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी पोलिस केस दाखल झाल्यानंतर डॉक्टर दाम्पत्यांनी आणखी अनेक जणांना असेच फसवले असल्याचे उघड झाले. या दाम्पत्याने शहरातील सुशिक्षित लोकांना २ ते १६ लाखांचा चुना लावत तब्बल ७२ लाख रुपये गडप केल्याचे उघड झाले आहे.

 

ओळखीतून विश्वाससंपादन करुन करायचे विश्वासघात

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगली कमाई करता येते, असे सांगत शहरातील उच्चभ्रूंची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पगारिया नगर येथील चेतन आणि उज्ज्वला भोपलवाद यांनी अनेकांना लाखोंचा गंडा घातला. हे प्रकरण एका चहावाल्याला फसवल्यानंतर उघड झाले आहे. कैलास नगर येथे चहाची टपरी चालवणारे कोकणवाडी येथील रहिवाशी सतीश नारायण सकुंडे यांच्यासोबत चेतन आणि त्याची पत्नी उज्ज्वला भोपलवाद यांनी ओळख निर्माण केली. सततच्या गाठीभेटी आणि चर्चेतून डॉक्टर दाम्पत्याने सतीश यांचा विश्वास संपादन केला. शेअर मार्केटमध्ये एक लाख रुपये गुंतवणूक करुन दर महिना सहा हजार रुपये कमाई करता येईल असे आमिष दाखवून या दाम्पत्याने सतीश यांच्याकडून २०१७ मध्ये २ लाख रुपये उकळले.

 

गॅलेन्ट फायनान्शिअल सर्व्हिसेस नावाने सुरु केली फर्म

चेतन आणि उज्ज्वला या ठग दाम्पत्याने गॅलेन्ट फायनान्शिअल सर्व्हिसेस नावाने फर्म सुरु केली होती. या फर्मच्या माध्यमातून ते लोकांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीचा सल्ला देत होते. सतीश यांनी दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र अनेक महिने झाले तरी त्यांना रिटर्न मिळाले नाही तेव्हा त्यांनी भोपलवाद यांच्याकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. भोपलवाद यांच्या पगारिया नगर येथील निवासस्थानीही त्यांनी खेट्या मारल्या. प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांनी सतीश यांची बोळवण केली. आपण फसवले गेलो असल्याचे लक्षात आल्यानंतर सतीश यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.  

 

दोन लाखच नाही तर ७२ लाखांचा गंडा

सतीश सकुंडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर डॉक्टर दाम्पत्याचे सर्वच कारनामे समोर आले आहेत. सतीश यांच्यासोबत या दाम्पत्याने सतीश यांच्यासोबत अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले. पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, भालचंद्र राऊत यांच्याकडून १६ लाख रुपये घेतले,  विनोद राऊत  यांना ४ लाख रुपयांचा गंडा घातला तर श्याम लहाने यांना १० लाख रुपयांना फसवले. आणखी चार जणांना मिळून एकूण ७२,४०,००० रुपये एवढी रक्कम या दम्पत्यान गडप केली आहे.